श्री साईज्ञानपीठ ट्रस्ट - नोंदणी क्रमांक - इ - २०९१० (मुं) दि. २० मार्च २००३.
 
उद्दिष्ट व कार्य

१९६९ मध्ये अनेक गुंतागुंत असलेल्या प्रापंचिक अडचणींच्या निवारणार्थ आम्ही दादांकडे मार्गदर्शनार्थ गेलो. १९७८ पर्यंत केवळ तर्काने न सुटणार्‍या प्रश्नांची उकल करून त्यांचे निराकरण करणारी एक शक्ती या दृष्टीनेच मी दादांकडे बघत होतो. या काळामध्ये आम्ही उभयता विमोचनविधींना उपस्थित राहिलो व दिक्षाही घेतल्या. हे सर्व कार्य दादा नेमके कशासाठी करीत आहेत याची मला फारच कमी माहिती होती. मला शास्त्रोक्त संगीताची बर्‍यापैकी जाण व तत्त्वज्ञानाविषयी ओढ असल्यामुळे केंद्रावर होणार्‍या भक्तिसाधनेतील पदांची कर्णमधुरता व त्यातून अत्यंत सोप्या शब्दांमध्ये प्रवाहित होणार्‍या तत्त्वज्ञानाने आम्ही भारावून गेलो व हा एक शाश्वत आनंदाचा झराच आहे याची खात्री पटली. १९७७ मध्ये दादांनी अडीअडचणींच्या निवारणार्थ होणारे कामकाज बंद केले व शिरोडा, गोवा, येथे साधना संमेलने आयोजित करण्यास सुरूवात केली. त्या संमेलनांना (एकूण ८ संमेलने – दर सहा महिन्यांनी होणारी) उपस्थित राहून जेव्हा दादांच्या मुलाखती (ज्ञानसाधना) ऐकण्याचे भाग्य आम्हाला प्राप्त झाले तेव्हा त्यांच्या कार्याची उपयुक्तता, व्याप्ती आणि अलौकिकत्व यांची आम्हाला पूर्णपणे जाणीव झाली. १९७८ ते १९८७ या दरम्यान ॐकार साधना अनेक स्थित्यंतरे होत पूर्णत्वाने सिद्ध झाली.

कार्यपद्धतीमधील एकसूत्रीपणाचा अभाव

भक्तिसाधना आणि ॐकार साधना करत असतांना स्वर-ताल-लय आणि स्थळ-काळ-वेळ यांचे अवधान कसे ठेवावे या संबंधीचे निकष दादांनी ठरविले होते. सुमारे ३५ वर्षे आम्ही दादांच्या नावे चालविल्या जाणार्‍या भारतातील विविध कार्यकेंद्रांवर अनेक वेळा (परदेशातील कार्यकेंद्रावर एकदा) उपस्थित राहिलो. तेव्हा आम्हाला असे प्रकर्षाने जाणवले की साधनात्रयी म्हणजे ‘ज्ञानसाधना’, ‘ॐकार साधना’ आणि ‘भक्तिसाधना’ ज्या पद्धतीने कार्यान्वित होत आहेत त्यामध्ये एकसूत्रीपणा, निकषांबाबत एकमत, आणि साधकांना करण्यात येणारे मार्गदर्शन यामध्ये नेमकेपणाचा अभाव आहे. त्याचबरोबर कार्यपद्धती वास्तुकेंद्रित व व्यक्तिकेंद्रित झाल्याचे जाणवू लागले.

१९८६ मध्ये वरील परिस्थिती मी दादांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तात्काळ असे उद्गार काढले की “मी जे प्रत्यक्ष विभूतींकडून मार्गदर्शन घेऊन तुम्हाला दिले त्याला तू शास्त्रात बसव.” आमचे भाग्य असे की दादांनी आमच्या घरी स्वत: उपस्थित राहून आणि साधना संमेलनातून तंबोर्‍याच्या नादझंकारात ॐकार साधना व आरतीसाधना करण्याची सुरुवात करून दिली. ही घटना आम्हाला अतिशय प्रेरणादायी ठरली. संकेत स्थळामधील “छायाचित्र कक्ष ” विभागात संबधित छायाचित्रांचा समावेश केला आहे.

प्रमाणित प्रशिक्षण प्रणालीची आवश्यकता

१९९१ मधील दादांच्या निर्वाणानंतर सर्वत्र अडीअडचणी निवारणार्थ होणारे कामकाज याच विषयाला प्राधान्य मिळू लागले. वास्तविक दादा कामकाज करत असताना ते नाथांच्या ज्या सिद्धसिद्धांतपद्धतींचा अवलंब करत असत त्या वरील साधनात्रयीमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत असे स्वतः दादा वेळोवेळी सांगत असत. त्यामुळे जुन्या व नवीन भक्तांना व साधकांना दादांच्या खर्‍या कार्याची ओळख कामकाजाच्या माध्यमातून न देता साधनात्रयीच्या “प्रमाणित प्रशिक्षण प्रणालीद्वारे” जिज्ञासूंचे प्रबोधन करणे अत्यावश्यक आहे. या निष्कर्षाप्रत आम्ही आलो व आम्हाला कामकाज हा विषय कालबाह्य, अनावश्यक व कार्याच्या मूळ स्वरूपापासून फारकत घेणारा ठरतो आहे हे जाणवले.

साधनात्रयी शैक्षणिक स्वरुपात

वं. दादांनी सिद्ध केलेल्या ज्ञान, भक्ती ॐकार या साधनात्रयीचा लाभ सामान्य जनांना कुठल्याही मध्यस्थाच्या मदतीशिवाय कर्मकांड व संप्रदायात न अडकवता घरबसल्या मिळावा हे आमच्या ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. १९८६ पासून सुमारे २५ वर्षे सखोल अभ्यास करून “साधनात्रयी” शैक्षणिक स्वरुपात स्थित्यंतरित करु शकलो. आमच्या ट्रस्टद्वारे होणार्‍या कार्याला श्री पंत महाराज - श्री साईनाथ महाराज - वंदनीय दादा (दत्त-नाथ-सुफी) यांचा आशीर्वाद व मान्यता आहे याची साक्ष देणार्‍या काही घटनांचा उल्लेख करणे उचित ठरेल.

१) ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त श्री. शरदचंद्र बाळ यांच्या निवासस्थानीसाधना संमेलनातून काही ज्येष्ठ सेवकांच्या उपस्थितीत वंदनीय दादांनी तंबोर्‍याच्या नाद झंकारात साधना करून आमच्या ट्रस्ट तर्फे होण्यार्‍या कार्याची जणू मुहूर्तमेढच केली होती.

२) श्री साई संस्थान शिर्डी व श्री साई ज्ञानपीठ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इ. स. २००१ ते २००४ पर्यंत एकूण ८ निवासी प्रशिक्षण संमेलने आयोजित केली होती.

३) श्री साई समाधी मंदिरात शिर्डी येथे दादांनी सिद्ध केलेल्या व आमच्या ट्रस्टच्या साधकांनी स्वर, ताल, लयीत म्हंटलेल्या “ॐ श्री साईनाथाय नमः” या मंत्राचा उदघोष नित्याने केला जातो तसेच हेच नामस्मरण संस्थानाच्या दूरध्वनी वर hello tune म्हणून वापरले जाते.

४) ट्रस्ट निर्मित "ॐकार साधना मार्गदर्शिका" या साधनेच्या डीव्हीडीचा प्रकाशन समारंभ स्वरभास्कर पं भीमसेन जोशी व गान सरस्वती विदुषी किशोरीताई आमोणकर यांच्या शुभहस्ते शिर्डी संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष श्री द. म. सुकथनकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्री साई संस्थानाने डिव्हिडिच्या निर्मितीच्या सुमारे रुपये ४ लाखाच्या खर्चाची परिपूर्ती आमच्या ट्रस्टला केली यासाठी आम्ही संस्थानाचे सदैव ऋणी आहोत. तसेच प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाच्या सुमारे ६००० डीव्हीडींची विक्रीची व्यवस्था शिर्डी संस्थानाने केली होती.

प्रशिक्षण केंद्र

ट्रस्ट तर्फे आजोजित होणार्‍या सर्व उपक्रमात व्यक्तिपूजा, अंधश्रद्धा, औपचार, कर्मकांड व कामकाज यांना अजिबात थारा दिला जात नाही. दादांनी सिद्ध केलेल्या साधनात्रयीच्या आधारे जिज्ञासूंना (१) शुद्ध परमार्थाची ओळख करून देणे. (२) साधक अवस्थेपर्यंत नेणे व (३) स्वयंसिद्ध होण्यास मदत करणे ही ट्रस्टची प्रमुख उद्दिष्टे आहेत. ज्ञान - भक्ति - ॐकार साधनात्रयीच्या सखोल प्रशिक्षणासाठी जिज्ञासूंनी कमीत कमी दोन दिवसांची शिबिरे आयोजित केल्यास ट्रस्ट तर्फे मार्गदर्शन केले जाते.