मानवी जीवन ईश्वरमय व्हावे.

गेल्या शतकातील विज्ञानाच्या अचंबित करणार्‍या अफाट प्रगतीमुळे केवळ ऐहिक सुखप्राप्तीची असंख्य साधने उपलब्ध झाली. मात्र मानवाला निरंतर समाधान देण्यासाठी ती पूर्णतः असमर्थ ठरली आहेत. चंगळवाद, स्वैराचार, जीवघेणी स्पर्धा, असुरक्षितता  आणि अशांती हे आजच्या समाजाचे चित्र आहे.

ईश्वरी तत्वाची  खरी ओळख करून देणारी आणि मानवी जीवन ईश्वरमय करण्याची क्षमता असलेली विश्वव्यापी, धर्मातीत आणि भाषा, देश, वर्ण, वंश, यांच्या सीमा उल्लंघून जाणारी एखादी उपासना पद्धती सिद्ध करणे हा वरील समस्यांवर उपाय ठरू शकतो. असे सूक्ष्म साधन मानवाच्या कल्याणाकरिता सिद्ध करणेे हे जगद्गुरू श्री साईनाथ महाराजांच्या “बाबांच्या” अवतार कार्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. वंदनीय “दादा” भागवत यांनी बाबांच्या आज्ञेने व कृपाशिर्वादाने ४५ वर्षाच्या कठोर तपश्चर्येने ज्ञानसाधना – भक्ति साधना (आरती साधना) आणि ॐकार साधना या साधनात्रयीची सिद्धता करून त्या उद्दिष्टांची पूर्तता केली.

साधकाने स्वयंसिद्ध व्हावे

कार्यारंभी सुमारे २७ वर्षे दादांकडे प्रापंचिक अडीअडचणींचे निवारण व्हावे या हेतूने प्रामुख्याने अनेक प्रश्नकर्ते ‘कामकाजासाठी’ येत असत. असंख्य व्यक्तींना त्याचा लाभही झाला. परंतू कामकाज हा कार्याचा मूळ उद्देश नसल्यामुळे बाबांनी अशी आज्ञा केली, की "जगाला सुख देण्यापेक्षा सुखाचा मार्ग दाखव". त्यानुसार दादांनी गुरूआज्ञेने ३० जून १९७७ (गुरुपुजन) या दिवशी ‘कामकाज’ हा विषय त्यांनी स्थगित केला आणि पुढील १२ वर्षात साधनात्रयीची सिद्धता त्यातील ॐकार साधनेसह पूर्णत्वाला नेली.

प्रमाणित प्रशिक्षण प्रणाली

सद्गुरु, प्रेषित व अवतारी माध्यमे ह्यांचे कार्य ते देहात असताना पूर्णपणे व्यक्तीकेंद्रित असते. किंबहुना ते तसेच असावे लागते. मात्र त्यामुळे त्यांच्या देहत्यागानंतर एक मोठी पोकळी निर्माण होते. अशा वेळी ते कार्य व्यक्ती किंवा वास्तूकेंद्रित होऊ न देता एका सुसंबद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने कार्यान्वित झाले तरच कार्याचा मूळ उद्देश अबाधित रहातो. नेमक्या याच कारणासाठी आम्ही दादांचे कार्य “प्रमाणित प्रशिक्षण प्रणाली” च्या स्वरुपात या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

आमची अशी भूमिका आहे  की वं. दादांच्या अलौकिक कार्याचा लाभ जास्तीत जास्त जिज्ञासू, मुमुक्षु व साधकांना संकेतस्थळासारख्या एका सर्वात प्रभावी आणि मध्यस्थाशिवाय कधीही उपलब्ध होणार्‍या माध्यमातून व्हावा. अभ्यागतांनी कृपया नोंद घ्यावी की या संकेतस्थळावर १९९१ पर्यंतचे म्हणजेच त्यांच्या देहत्यागापर्यंतचे कार्य विचारात घेतले आहे.

अधिकाधिक अभ्यागतांनी या संकेतस्थळाचा उपयोग करावा आणि संकेतस्थळ स्थापनेमागील उद्दिष्टांची आमच्या हातून यशस्वीपणे पूर्तता व्हावी अशी सदगुरु चरणी प्रार्थना !

“शुभं भवतु”

श्री साई ज्ञानपीठ ट्रस्ट, मुंबई