वंदनीय दादांच्या मुलाखतींचा भावार्थ

शैक्षणिक व प्रबोधनात्मक स्वरुपात पुनर्मांडणी : तत्ववेत्याने केवळ तत्त्वज्ञान हाच विषय घेऊन त्याच्या विचारांची अथवा सिद्धांतांची विषयानुसार मांडणी करून ग्रंथनिर्मिती केली की ते विचार किंवा सिद्धांत सुलभतेने समजून घेता येतात. परंतु आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीचे प्रत्यक्ष अनुभूतीवर आधारित असलेले विचार आणि सिद्धांत हे सामन्यात: काव्य, संवाद, कृती व त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींबरोबर केलेल्या व्यवहारातून व्यक्त होतात. त्यातील अमूक एक अविष्कार म्हणजे त्यांचे तत्वज्ञान असे म्हणता येत नाही. त्या सर्वांची उकल करून जगासमोर प्रबोधनात्मक स्वरूपात मांडण्याचे काम अतिशय आव्हानात्मक व जिकीरीचे होऊन बसते आणि त्यात भर म्हणून की काय, असे आव्हान स्वीकारणारा सामान्यतः आत्मज्ञानी नसतो. केवळ भक्ती, तळमळ, निष्ठा व श्रद्धा आणि इतरांना ज्ञानभांडाराचा लाभ व्हावा अशी तीव्र इच्छा याच त्याच्या प्रेरणा असतात. अशा परिस्थितीत ती व्यक्ती जर अभ्यासू व बहुश्रुत नसेल, तर त्यांच्याकडून अभिव्यक्ती ही एकांगी, स्वत:ला झेपेल आणि सोयीस्कर ठरेल अशाच दृष्टीकोनातून केली जाते. असे हे गुंतागुंतीचे व अवघड काम एक आव्हान म्हणून आम्ही अत्यंत सावधानपणे स्विकारले आहे.

दादा कार्यरत असताना अनेक वेळा भौतिक शास्त्रांचे नियम पूर्णपणे उल्लंघून जाणारे अनेक चमत्कार घडले. विशेषतः संचारावस्थेत, वंशविमोचन, ऋणविमोचन कार्यान्वित करत असतांना उद्भवलेले प्रसंग आणि ‘कामकाज’ करतांना भक्तांना दादांच्या अतिन्द्रिय शक्तीचे आलेले अनुभव या सगळ्यामध्ये दादांच्या खर्‍या कार्याचे उद्दिष्ट काय आहे हा विषय पूर्णपणे दुर्लक्षित राहिला.

ज्ञानसाधना कार्याचा पाया : दादा नेहमी म्हणत असत की, अज्ञान हेच दुःखाचे मूळ कारण आहे. इतर संत महात्म्यांनी सुद्धा वेगळे सांगितले नाही, विज्ञानाच्या साहाय्याने निर्माण झालेल्या सुखाच्या साधनांचा उपभोग घेत राहून दुःखाचे मूलतः निर्मूलन होईल या भ्रमात प्रापंचिक माणूस जीवन व्यतीत करीत असतो. त्यांना परमार्थाची गोडी लावण्यासाठी दादांना कार्यारंभी कामकाज करणे आवश्यक होते. वास्तविक ज्ञानसाधना हा साधनात्रयीचा सर्वात महत्वाचा भाग. कारण तो भाग आत्मसात केल्याशिवाय ईश्वरीतत्वाची ओळख करून देणारे कुठलेही साधन बुद्धीजीवी जिज्ञासू श्रद्धेने व निष्ठेने स्वीकारणार नाही.

दादांनी मुलाखतीद्वारे केलेला तत्वबोध त्यांच्या कार्याचा पायाभूत विषय आहे. परंतु त्याची व्यवस्थित मांडणी करून पाठ्यपुस्तकाच्या स्वरुपात जगासमोर ठेवण्याइतका निवांतपणा किवा उसंत त्यांना कधीच मिळाली नाही. त्यांच्या देहत्यागानंतरही अशा प्रकारचा प्रयत्न कुठेही झालेला दिसत नाही. परिणामतः एका ज्ञानभांडारापासून जिज्ञासू वंचित राहिले. त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी खालील दस्तऐवज उपलब्ध आहे.

    पृष्ठ संख्या सुमारे
१. पूण्य विभूतींनी 'दादांच्या' माध्यमातून दिलेल्या मुलाखती (१९६१-१९६३) ३५०
२. 'दादांनी' केलेला पत्रव्यवहार ११५
३. 'दादांनी' वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिका निवेदने (१९६० ते १९८३) २५०
४. शिरोडा (गोवा) येथे ८ साधना संमेलनात दिलेल्या 'दादांनी' मुलाखतींचे कॅसेटवरून केलेले  शब्दांकन (१९७९ ते १९८३) १२००
५. दादांनी कथन केलेले व नंतर शब्दांकन करून केवळ खाजगी वितरणासाठी  प्रसिद्ध केलेले २ ग्रंथ गुरुप्रसाद (११.७.१९८७) आणि आत्मनिवेदन (१८.३.१९९९) ६४०
  सुमारे २५५५

वाचकवर्ग : वरील सर्व साहित्य हे केवळ खाजगी वितरणासाठी प्रसिद्ध झाले होते. त्याचा वाचकवर्ग हा कुठल्यातरी निमित्ताने दादांच्या कार्याची ओळख असलेला आहे. परंतु वरील ज्ञानभांडार अधिकाधिक जिज्ञासुंपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज आहे. पण ते उपलब्ध करताना त्याचा वाचक हा गुरुमार्गी असेलच असे नाही, किंबहुना अशी शक्यता कमीच. आस्तिक, नास्तिक, जडवादी, अद्वैतवादी, द्वैतवादी, धड आस्तिक नाही ना नास्तिक व किंवा सोयीनुसार आस्तिक वा नास्तिक अशी सरमिसळ असलेल्या वाचकवर्गाला एखादी विशिष्ट भूमिका व त्याला न पटणारी गृहीतके धरून वरील साहित्याचे संकलन करणे चुकीचे होईल. एखाद्या विज्ञानाधिष्टीत दृष्टीकोनातून जगाचे व्यवहार बघणार्‍याला सुद्धा अध्यात्म दर्शनाची ओढ निर्माण होईल अशी त्याची मांडणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

प्रकाशने : १) शरदचंद्र बाळ यांनी संकलीत केलेले 'भावार्थ मार्गदर्शिका' (खंड पहिला) हे पुस्तक ॐकारसाधनेच्या डिव्हिडिसहीत प्रकाशित करून वरील कार्याची रुजुवात केली आहे. 'औदुंबर' या प्रतिथयश संस्थेतर्फे दि. ३ जुलै २०१२ रोजी हे पुस्तक प्रसिद्ध झाले. जन्माचे कारण, ऋणानुबंध, कर्मसिद्धांत, दुःखामागील कारणमीमांसा व निवारण, ईश्वरी उपासना कशी व कोणती करावी इत्यादी विविध गहन विषयांचे अत्यंत सहजतेने आकलन करून देणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकात 'दादांनी' १९६१-६३ दरम्यान दिलेल्या मुलाखतींचा भावार्थ अंतर्भूत असून ५० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर प्रथमच 'दादांनी' केलेल्या तत्वबोधाची ओळख सामान्य जनांना होत आहे.

२) पुस्तकातील काही परिच्छेद आणि वर्तमान पत्रातून प्रसिध्द झालेले अभिप्राय प्रसिद्धी विभागात बघता येतील. दि. ३१ जुलै २०१५ रोजी "कर्मविमोचन आणि उपासना" हा श्री. शरदचंद्र बाळ यांनी संकलीत केलेला 'भावार्थ मार्गदर्शिका' खंड दुसरा आमच्या ट्रस्टने प्रकशित केला असून या पुस्तकाचे 'बळवंत पुस्तक भांडार', गिरगांव, मुंबई - ४ हे प्रमुख वितरक आहेत. हे पुस्तक वं. दादांनी विजयादशमी १९६० रोजी खाजगी वितरणासाठी प्रसिद्ध केलेल्या 'साधन पत्रिका' या पुस्तकावर आधारीत असून त्या पुस्तिकेतील तपशिलात आवश्यक ते फेरफार व काही विषयांची भर घालून पुर्नमांडणी केली आहे. तिसर्‍या खंडाचे काम सुरु असून यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

जास्तीत जास्त वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी श्री. सदगुरु चरणी प्रार्थना.

 
 
वरील तक्ता मोठ्या आकारामध्ये पाहण्यासाठी इथे क्लिक करा.