वंदनीय दादा भागवत (१९२१ - ९१)

संक्षिप्त चरित्र व कार्याची रुपरेषा (कालक्रमान्वये)

(१९२१  ते  १९४२)

वंदनीय दादा भागवत यांचा जन्म सातारा येथे ६ फेब्रुवारी १९२१ रोजी झाला. भागवत घराण्यात आई वडिलांकडून ३ पिढ्या दत्तपरंपरेतील सेवा चालू होती. बालपणीच त्यांना श्री. तेलीमहाराज या सत्पुरुषांचे मार्गदर्शन लाभले. वडिलांनी 'दादांना' फकिरीची दीक्षा दिली होती. ही घटना म्हणजे भविष्यात दादांना होणार्‍या सूफी विभूतींच्या मार्गदर्शनाची नांदीच होती. एकेकाळी ज्यांना सातार्‍यात सोनेरी भागवत म्हणून संबोधित असत अशा भागवत घराण्याला वडिलांचा व्यवसाय काही अतर्क्य घटना घडल्यामुळे डबघाईला आल्याने विपन्नावस्था आली. या सर्वामागे एखादी विध्वंसक शक्तीच कार्यरत असावी याची दादांना जाणीव झाली व त्याच बरोबर एखादी अगम्य विधायक शक्तीसुद्धा जगात कार्यरत असणार याची खात्री वाटून आपण त्याचा शोध घेतला पाहिजे असा दादांनी निर्धार केला.

(१९४२ ते १९६०)

१९४२ साली जागतिक लढाईमुळे होणार्‍या सैन्य भरतीत दादा सामील झाले. सैन्यात असताना त्यांना बगदाद व करबला या पवित्र स्थळी भेट देण्याचा योग आला. ७ मार्च १९४९ रोजी 'दादांचा' विवाह झाला तदनंतर श्री दत्तगुरुंची सेवा चालू असताना दादांना त्यांच्या भावी काळात प. पू. बाबांची सेवा करण्याचे आज्ञावजा संकेत मिळाले. बाबांच्या आज्ञेने विवाहानंतर ३ वर्षातच दादांनी नोकरी सोडली व श्री. क्षेत्र औदुंबर येथे २|| वर्षे माधुकरी मागून सेवा केली. १९५६ मध्ये विजयादशमीला 'दादांनी' - "श्री साई आध्यात्मिक समितीची" स्थापना केली व प्रथम मुंबई दादर येथे हेमकुंज या निवासस्थानी व त्यानंतर १९५९ मध्ये ह्युजेस रोड, अजिंक्य मॅन्शन या वास्तूत दुसरे कार्य केंद्र सुरु केले. १९६७ पर्यंत मुंबई येथील दोन्ही केंद्रे कार्यरत होती.

सेवा काळ संपल्यानंतर प.पू. हाजीबाबा यांचे नित्याने होणार्‍या मार्गदर्शनानुसार नाथांच्या सिद्धसिद्धांत पद्धती कार्यान्वित करुन असंख्य दु:खी जीवांच्या समस्यांचे कामकाज या माध्यमातून निराकरण केले.

(१९६० ते १९६७)

१९६० ते १९६४ दरम्यान 'जन्मउत्पत्ति मिमांसा' या विषयावर सूफी विभूतींनी दादांच्या माध्यमातून भक्तांची वैचारिक बैठक निकोप व्हावी या उद्देशाने अनेक वेळा मुलाखती दिल्या.

१९६२ साली प.पू. मोईउद्दीन चिश्ती अजमेर शरीफ यांनी दादांना भक्तिसाधने (आरती साधना) च्या सिद्धतेसाठी श्री. पंत महाराज बाळेकुंद्री यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जाण्याची आज्ञा केली.

या काळातच जन्मकर्म, जन्मजन्मांतर, मातृपितृ, इतरेजन आणि देवादिक या पाच ऋणानुबंधांनी बद्ध झालेल्या नर देहाला प्रथम वंशविमोचन, कर्मविमोचन व ऋणमोचन  अशा अनेक शास्त्रोक्त विधीपरत्वे मुक्त करण्याचे कार्य दादांनी केले. त्याचप्रमाणे भक्तांना उपासना दीक्षा, नामःस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा आणि गुरुदीक्षा यांचा लाभ झाला. परंतु बहुतांशी भक्त प्रापंचिक अडचणीप्रित्यर्थ होणारे 'कामकाज' हाच विषय म्हणजे दादांचे कार्य असे सोयिस्करपणे समजून कार्यात सहभागी होत असत. लोकसंग्रह झाल्याशिवाय कार्य जगापुढे येऊ शकत नाही व लोकांच्या अडचणी निवारण केल्याशिवाय लोकसंग्रह होत नाही आणि झाला तरी तो फक्त 'अडचणी निवारण' या कार्यासाठी होतो अशी अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दादांनाही सबुरी ठेवणे भाग पडले असावे.

(१९६७ ते १९७७)

६ ऑगस्ट १९६७ रोजी दादांनी गुरु आज्ञेने लंडनला प्रयाण केले. तेथील Spiritual Association of Great Briton  या संस्थेच्या संचालकांना पहिल्या ५-६ भेटीतच असे अनुभवास आले की, दादा म्हणजे एक उच्च कोटीची सिद्धता असलेले माध्यम आहे. ९ महिन्याच्या वास्तव्यानंतर संस्थेने देऊ केलेले भरीव मानधन नाकारुन दादा बाबांच्या आज्ञेने भारतात परतले. दादांच्या गैरहजेरीत तथाकथित भक्तांनी कार्याची घडी पार विस्कळीत करुन टाकली होती. अथक प्रयत्नांनी वांद्रा कर्तव्य सदन या वास्तूत कार्यकेंद्राची तात्पुरती सोय करुन १९६९ मध्ये वांद्रे येथे लक्ष्मीनारायण या वास्तूत कार्यकेंद्राची स्वतंत्र जागा झाली. १९९३ पर्यंत हे केंद्र कार्यरत होते.

(१९७७ ते १९८९)

मुलाखतीद्वारे सिद्ध झालेली ज्ञानसाधना आणि श्री पंत महाराजांच्या आशिर्वादाने सिद्ध झालेली भक्तिसाधना म्हणजे साधनात्रयीचेे पहिले दोन भाग. प.पू. बाबांनी ३० जून १९७७ या गुरुपूजनाच्या दिवशी अडचणी निवारणार्थ होणारे कामकाज बंद करण्याची आज्ञा केली कारण दादांच्या हातून एका अलौकिक कार्याची पूर्तता व्हायची होती ती म्हणजे ॐकार साधनेची सिद्धता. दादांनी १९७९ ते १९८३ दरम्यान शिरोडा, गोवा येथे दर सहा महिन्यांनी होणार्‍या ८ निवासी साधना शिबीरांचे आयोजन केले. दरम्यान २७ ऑक्टोबर १९८२ (विजयादशमी) रोजी 'श्री साई शक १' ची स्थापना करुन मानवता युगाचा श्री गणेशा केला.

दादांनी श्री साई आध्यात्मिक समितीची स्थापना विमोचने, दीक्षाविधी, नित्य साधना कार्यान्वित करण्यासाठी केली होती. या उद्दिष्टांची पूर्तता झाल्यानंतर अक्षय तृतीया श्री साई शक ३, सन १९८५ मध्ये दादांनी 'श्री साई स्वाध्याय मंडळ' या ट्रस्टची स्थापना केली. वरील काळात कारण आणि महाकारण या दीक्षांचाही भक्तांना लाभ झाला. ट्रस्टची रितसर स्थापना अशासाठी की त्या पैशाचा विनियोग शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर सामाजिक कार्यात गरजूंना मदत म्हणून योग्य तर्‍हेने व्हावा व त्यावर आवश्यक ते नियंत्रण असावे.

विश्वातील ज्या आदिशक्तीमधून सर्व देवदेवता मानवाच्या जीवनाचे सार्थक व्हावे म्हणून अवतीर्ण झाल्या त्या मूळ आदिशक्तीचे पीठ स्थापन करण्यासाठी दादांना दत्त - नाथ - सूफी पंथातील विभूतींचे मार्गदर्शन प्राप्त झाले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक अशा सर्व विधींची व उपचारांची पूर्तता शास्त्रोक्त पद्धतीने करुन गुरुवार, चैत्र प्रतिपदा दि. १४ एप्रिल १९८३ रोजी दादांनी श्री साईधाम (पर्वरी) गोवा या वास्तूत "श्री शक्तीपीठा" ची स्थापना केली. देहिक-आत्मिक व गुरुशक्ती यांचे एकरुपत्व साधकाच्या ब्रम्हरंध्राचे ठिकाणी धारण होऊन त्याचा देह काया-वाचा-मनाने इतरांचे कल्याण व स्वतःच्या जीवनाचे सार्थक करु शकेल इतकी सिद्धता "श्री शक्तीपीठ" स्थापनेमध्ये आहे. म्हणजेच नरदेह शक्तीपीठासारखे कार्य करण्यासाठी सिद्ध केला.

(१९८९ ते १९९१)

दादांचे कार्य त्यांच्या मर्जीनुसार चालत नव्हते. दादांनी केलेली साधनात्रयीची सिद्धता हा एका ईश्वरी योजनेचाच अविष्कार आहे. १९५२ साली दादा "बाबां"च्या दर्शनासाठी शिरडीला गेले होते. त्यावेळी दादा अब्दुल बाबांच्या दर्शनार्थ गेले. त्या भेटीत अब्दुल बाबा म्हणाले की बाबांनी मला अशी आज्ञा केली आहे की माझा एक सुपुत्र तुझ्या भेटीला येईल व त्याच्या हाती हे उदीने भरलेले मडकुले बाबांची ठेव म्हणून सुपूर्त कर. ही घटना प.पू. बाबा १९१८ साली समाधिस्थ होण्याआधी २ वर्षे घडली होती की जेव्हा दादांचा जन्मही झाला नव्हता. (दादांचा जन्म १९२१) अशा रितीने अब्दुल बाबांनी ३५ वर्षाच्या अथक प्रतीक्षेनंतर दादा हेच बाबांचे प्रेषित आहेत याची खात्री पटल्यानंतर ते उदीने भरलेले मडकुले त्यांनी दादांच्या स्वाधीन केले. अशी होती दादांच्या कार्यामागील ईश्वरी योजना. परंतु दादांच्या जीवनातील अशा अनेक चमत्कारांची उजळणी व रसभरीत वर्णने न करता, दादांनी सिद्ध केलेली साधनात्रयी कार्यान्वित करणे हेच आम्हा साधकांचे आद्य कर्तव्य ठरते.

निर्वाण - १९८९ मध्ये ॐकार साधनेची सिद्धता व दत्त, नाथ  आणि सूफी पंथाचा समन्वय झाल्यावर शेवटची दीड  ते दोन वर्षे अनेक आघात व कठोर तपश्चर्येमुळे करावयाला लागणार्‍या परिश्रमामुळे शारिरीक व्याधींनी उचल खाल्ली आणि शेवटी ज्येष्ठ वद्य पंचमी मंगळवार दि. २ जुलै, १९९१ रोजी दादांनी देहत्याग केला व ते श्री साईचरणी विलिन झाले.